

1.50 lakh devotees will come for darshan on the occasion of Ashadhi at Narsi Namdev
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशीनिमित्त रविवारी सुमारे १.५० लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांनी दिली.
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण मराठवाड्यातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची सोय व्हावी तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन संस्थानच्या वतीने ६० बाय १४० व ३० बाय १३० चौरस फुट आकाराचे दोन वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, संस्थानचे विश्वस्त मनोज आखरे, द्वारकादास सारडा, भिकुलाल बाहेती, माजी सभापती संजय ऊर्फ भय्यासाहेब देशमुख, ब्रिजलाल तोष्णीवाल, राहुल नाईक यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
सकाळी महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. आषाढी एकादशीमुळे सकाळपासूनच भाविकांची गर्दी होणार असून दिवसभरात सुमारे १.५० लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. या भाविकांसाठी ४० ते ५० क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाणार आहे. या शिवाय नर्सी नामदेव पोलिस ठाणे व पोलिस मुख्यालयातील सुमारे १०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.