

Jyotirlinga Darshan Aundha Nagnath
हिंगोली : देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (दि.१५) देशभरातून भाविकांची गर्दी झाली. सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे 40 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला . भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अभिषेक पूजा बंद करण्यात आली.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त शनिवारी रात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुजा झाली. यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिहर भोपी, कृष्णा ऋषी, पद्माक्ष पाठक, नगरसेवक गुड्डू बांगर, निळकंठ देव, वैजनाथ पवार, सुरेंद्र डफळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मध्यरात्री पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रविवारी पहाटे दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पश्मिच दरवाजातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील भाविक दर्शनासाठी आले आहेत.
सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे 40 हजार भाविकांनी नागनाथाच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, हर हर महादेव, बम बम बोलेच्या गजराने मंदिराचा परिसर दुमदुमला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून भाविकांची गर्दी वाढली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सकाळपासूनच अभिषेक पुजा बंद करण्यात आली.
तर रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना पिण्याचे पाणी, तसेच 25 क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप केले जात आहे. या शिवाय दानशूर व्यक्तींकडून साबुदाना खिचडी वाटप केली जात आहे. रात्री सात वाजता नागनाथाची पालखी मिरवणुक काढली जाणार असून त्यानंतर लेझर ड्रोन शो होणार आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी भाविकांची गर्दी वाढल्याचे संस्थानचे कर्मचारी वैजनाथ पवार यांनी सांगितले.