

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहायकाने 53.95 लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहायक (लेखा) एस. सी. जावळे यांनी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत शंका आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेला कळविले होते. त्यानंतर जावळे यांनी बनावट स्वाक्षरी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनतर जावळे यांना निलंबित करण्यात आले होते.
त्यावरून जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने पशुसंवर्धन विभागाच्या लेखा विभागातील कारभाराची सविस्तर चौकशी केली होती. जावळे या पशुसंवर्धन विभागात रुजू झाल्यापासून म्हणजेच साधारणतः सन 2015 ते सन 2025 पर्यंतच्या कामकाजाची तपासणी सुरू केली होती. या तपासणीमध्ये जावळे यांनी पशुसंवर्धन विभागातील सेवा शुल्काची 39.80 लाख रुपये तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची धनादेशावर स्वाक्षरी करून सदर रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यात वळती केल्याचे स्पष्ट झाले.
या सोबतच वेतन व भत्ते कपातीचे 12 लाख रुपये, पुरवठादारांची जीएसटी, टीडीएसची सुमारे 2.11 लाख रुपये वेगवेगळ्या धनादेशावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून एकूण 53.95 लाख रुपयांची रक्कम आपल्या खात्यात वर्ग करून अपहार केल्याचे स्पष्ट झाले. यावरून जिल्हा परिषदेने कनिष्ठ सहाय्यक जावळे यांना नोटीस देऊन तातडीने सदर रकमेचा भरणा करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून त्यांनी 29.99 लाख रुपये कार्यालयात धनादेशाद्वारे जमा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, यावरून पोलिसांनी एस. सी. जावळे विरुध्द अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार युवराज वाघमारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.