

* गतसप्ताहात शुक्रवारच्या सत्रात आयटी समभागांतील विक्रीमुळे बाजारात तीव्र घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्स 1048 अंकांनी म्हणजेच 1.25% घसरून 82626.76 वर बंद झाला. तसेच निफ्टी 336.10 अंकांनी म्हणजेच 1.3% घसरून 25471 वर बंद झाला. निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे 1.44% घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची सुमारे 7 लाख कोटींची संपत्ती कमी झाली. यावर्षी आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये होणार्या प्रगतीमुळे भारतातील आयटी कंपन्यांवर दबाव आला आहे. आजपर्यंत भारतीय आयटी कंपन्या या जागतिक आयटी कंपन्यांना जे प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअर बनवून देत होत्या, ते आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)करून देत आहे. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. जागतिक संकेत, अमेरिकेतील मागणीतील मंदी आणि आयटी कंपन्यांच्या महसूल वाढीवरील दबाव यामुळे भारतीय भांडवल बाजारात विक्री वाढल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
* चालू आर्थिक वर्षात 10 फेब्रुवारीपर्यंत थेट कर संकलनात 9.4% वाढ होऊन ते 19.43 लाख कोटींवर पोहोचले. परताव्यांमध्ये 18.8% घट होऊन ती रक्कम रु. 3.34 लाख कोटी राहिली. कॉर्पोरेट कर संकलन रु.8.89 लाख कोटी, तर वैयक्तिक आयकर रु.10.03 लाख कोटी इतका राहिला. सरकारने निश्चित केलेल्या अंदाजाच्या सुमारे 80% उद्दिष्टाची पूर्तता झाली आहे. आर्थिक शिस्त आणि वाढत्या करआधारामुळे महसूल वृद्धी कायम असल्याचे संकेत मिळाले आहेत.
* डिसेंबर महिन्यात एअरटेलने 5.43 दशलक्ष नवे ग्राहक जोडले, तर जिओने 2.96 दशलक्ष ग्राहकांची भर घातली. त्यामुळे ग्राहकवाढीत एअरटेलने आघाडी घेतली. जिओची एकूण ग्राहकसंख्या 489 दशलक्षवर, तर एअरटेलची 463.4 दशलक्षवर पोहोचली. व्होडाफोन, आयडिया व बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत घट कायम राहिली. 5जी फिक्स्ड वायरलेस सेवांमध्येही एअरटेलने जिओपेक्षा अधिक ग्राहक जोडल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.
* जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 2.75% वर नोंदवला गेला. महागाई मोजणीसाठी आधार वर्ष 2012 वरून 2024 करण्यात आल्याने निर्देशांकाच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. अन्न घटकाचे वजन सुमारे 46% वरून 37% पर्यंत कमी करण्यात आले असून, सेवाक्षेत्रातील घटकांचा समावेश वाढविण्यात आला आहे. जुन्या मालिकेनुसार डिसेंबरमधील महागाईदर 1.33% होता. नव्या मालिकेमुळे महागाईतील चढ-उतार कमी होऊन निर्देशांक अधिक स्थिर राहण्याची अपेक्षा व्यक्तकरण्यात आली आहे. नव्या सूत्रानुसार ऑनलाईन वस्तूंच्या भावातील चढ-उतार तसेच ओटीटी सबस्क्रिप्शनचे वाढणारे भाव, ग्रामीण भागातील भाडेकरार, रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे भाव, मोबाईलच्या रिचार्जचे भाव हे देखील आता किरकोळ महागाई मोजताना ग्राह्य धरले जाणार आहेत. 2012 साली विशेषतः मोबाईलचे रिचार्ज किंवा ऑनलाईन खरेदी, ओटीटीचे सबस्क्रिप्शन यासारख्या गोष्टी सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर होत्या; परंतु आता सर्वसामान्य कुटुंबातील एकूण खर्चापैकी एक महत्त्वाचा भाग या सेवांमध्ये खर्च होतो. त्यामुळे त्याचा महागाई दरामध्ये समावेश करणे आवश्यक होते.
* टाटा मोटर्सने तामिळनाडूमध्ये रु. 9,000 कोटींचा जेएलआर उत्पादन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून दरवर्षी 2.5 ते 3 लाख वाहनांचे उत्पादन अपेक्षित आहे. रेंज रोव्हर इव्होकचे स्थानिक उत्पादन सुरू करण्यात आले असून, पुढील टप्प्यात इतर मॉडेल्सचा समावेश होणार आहे. प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. भारतातील लक्झरी वाहन उत्पादन क्षमता वाढविण्याच्या द़ृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे.
* अमेरिकेने रिलायन्स इंडस्ट्रीजला व्हेनेझुएलातून कच्चे तेल आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारताला पर्यायी आणि तुलनेने स्वस्त कच्च्या तेलाचा पुरवठा उपलब्ध होऊ शकतो. ओएनजीसीलाही व्हेनेझुएलातील अडकलेल्या गुंतवणुकीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऊर्जा सुरक्षेच्या द़ृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
* कार्लाइल समूहाने एडेलवाईसच्या गृहनिर्माण वित्तपुरवठा (होम फायनान्स) विभागात रु. 2,100 कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. या व्यवहारातून सुमारे 73% हिस्सा संपादन केला जाणार आहे. आदित्य पुरी यांचाही या व्यवहारात वैयक्तिक सहभाग असणार आहे. व्यवहारासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतर नियामकांची मान्यता आवश्यक आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीची भांडवली क्षमता मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
* अॅक्सिस बँकेने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी सुवर्णकर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत कर्ज-मूल्य प्रमाण 82% पर्यंत उपलब्ध आहे. कर्जरक्कम रु. 50 हजार ते रु. 1 कोटीपर्यंत दिली जाणार आहे. मर्यादित कागदपत्रे आणि केवायसी प्रक्रियेद्वारे तत्काळ वितरणाची सुविधा उपलब्ध आहे. उद्योगांना कार्यभांडवल उभारण्यासाठी हा पर्याय उपयुक्तठरणार आहे.
* जानेवारी महिन्यात डिमॅट खात्यांची संख्या 21.95 कोटींवर पोहोचली. महिन्यात 3.62 दशलक्ष नव्या खात्यांची भर पडली, जी 16 महिन्यांतील उच्चांकी वाढ आहे. सीडीएसएलकडे 17.59 कोटी, तर एनएसडीएलकडे 4.36 कोटी खाती नोंदली गेली. किरकोळ गुंतवणूकदारांचा बाजारातील सहभाग सातत्याने वाढत असल्याचे यावरून दिसते. प्राथमिक बाजारातील सक्रियता आणि डिजिटल सुलभतेमुळे ही वाढ झाली आहे.
* 7 फेब्रुवारी 2026 रोजी संपलेल्या सप्ताहात देशाच्या परकीय चलन साठ्यात 6.71 अब्ज डॉलरची घट होऊन तो 717.6 अब्ज डॉलरवर आला, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केली. यापूर्वीच्या सप्ताहात गंगाजळी 723.8 अब्ज डॉलरपर्यंत वाढली होती. या घसरणीत परकीय चलन मालमत्ता घटकात 7.66 अब्ज डॉलरची घट होऊन तो 570.05 अब्ज डॉलरवर आला. सोन्याच्या साठ्यात किरकोळ बदल नोंदवण्यात आला. एकूण साठा अद्याप 11 महिन्यांपेक्षा अधिक आयात गरजा भागविण्यास सक्षम असल्याचे बँकेने स्पष्ट केले. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशाची बाह्य स्थिती सक्षम असल्याचा विश्वास रिझर्व्ह बँकेचे राज्यपाल संजय मल्होत्रा यांनी व्यक्तकेला आहे.