Hingoli : मोफत पासमुळे खेड्यातील शाळा ओस पडण्याच्या मार्गावर
औंढा नागनाथ : शासनाने शिक्षणाच्या सोयी सुविधांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत पास देण्याची योजना सुरू केली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातही ही योजना लागू असून येथील विद्यार्थींनींना मोफत पास व मुलांना सवलतीच्या दरात पास मिळत आहेत. यामुळे खेड्यातील शाळा ओस पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यामध्ये 145 वाडी, तांडे, गावे असून या प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. शासनाने शिक्षणाच्या सोयी-सुविधांसाठी ग्रामीण भागातील मुलींना मोफत पास देण्याची योजना सुरू केली आहे. तसेच मुलांनाही सवलतीच्या दरात मोफत पास मिळत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक मुले-मुली शहरी भागातील शाळांध्ये शिक्षण घेत आहेत.
तालुक्यातील काही गावांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे, तर काही गावांमध्ये दहावी- बरावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत व सवलतीच्या पासेसमुळे खर्च कमी झाल्याने मुलांना शहरात दर्जेदार शिक्षण मिळेल, या समजूतीने मुले- मुली शहरातील शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. यामुळे गावातील शाळांध्ये विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावात ज्या इयत्तेपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. तेथून पुढील शिक्षणासाठी मुलींना मोफत पास देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

