

30 Automatic Weather Stations will be set up in the Hingoli district
भीमराव बोखारे
वसमत : स्कायमेटच्या महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळांच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ३० हवामान केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे महसूल मंडळातील प्रत्येक गावातील पावसाची अचूक माहिती मिळणार आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या माहितीत भर पडणार असून या योजनेमुळे पीकविमा योजनांकरिता फायदा होणार आहे.
महावेध प्रकल्पांतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारीतून प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून हवामानविषयक विविध घटकांची माहिती गोळा करण्यास मदत होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महसूल मंडळात आवश्यकतेनुसार स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून पर्जन्यमान, कमाल व किमान तापमान, साक्षेप आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग व दिशा आदी घटकांच्या नोंदी घेण्यात येत आहेत.
मात्र, सद्यस्थितीत महसूल मंडळात एकाच गावात हवामान केंद्र असल्याचे चित्र आहे पावसाचा लहरीपणा पाहता एका शिवारात पाऊस होतो तर दुसऱ्या शिवारात पावसाची प्रतीक्षा असते. सर्वदूर पाऊस क्वचितच होत असल्याचेही अनेकवेळा पहावयास मिळते. स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असले तरी स्वयंचलित केंद्राची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
जिल्ह्यात ३० स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहेत. यापूर्वी उभारलेले हवामान केंद्र कमी पडत असल्याने नव्याने निर्माण झालेल्या १२ महसूल मंडळात हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. महसूल मंडळांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. परिसरात झालेल्या पावसाची माहिती, तापमान, हवेचा दाब आदींची माहिती गावातच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
हिंगोली व वसमत तालुक्यात प्रत्येकी सात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत तर कळमनुरी ६, औंढा नागनाथ ४, सेनगाव तालुक्यात ६ केंद्र उभारण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीने स्यंचलित हवामान केंद्रे उभी करण्यासाठी जागा करून दिल्यास तेथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे नियोजनही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.