

Siddheshwar dam water release
औंढा नागनाथ : येलदरी धरणातून पूर्णा नदी पात्रात होणारे विसर्ग व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर जलाशयात पाणी येण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जलाशयाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सिद्धेश्वर धरणातून होत असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.१७) दुपारी धरणाचे पूर्ण १४ गेट दीड मीटर उघडून 33 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला.
जलाशयात पाण्याच्या येवानुसार औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीपात्रात गत एक महिन्यापासून कमी अधिक प्रमाणात निरंतर विसर्ग सोडण्यात येत आहे. सोमवारी पाणलोटक्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टी मुळे तसेच येलदरी धरणातून होत असलेल्या विसर्गातून सिद्धेश्वर जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जलाशयाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी दुपारी धरणाच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली.
सद्यस्थितीत सिद्धेश्वर धरणाचे संपूर्ण १४ गेट ३ फूट उघडून ३३४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलाशयात येणाऱ्या पाण्याच्या येवा प्रमाणे विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभाकडून देण्यात आली आहे.