

Hingoli Blood Donation news
हिंगोली : सण, उत्सव म्हटले की पोलिसांसाठी कसोटीचा काळ समजल्या जातो. मात्र या परिस्थितीतही हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळत मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिरातून ६० रक्त बाटल्यांचे संकलन केले. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांनीही रक्तदान केले.
जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असून जिल्हाभरात १५०० ठिकाणी गणेशमूर्ती स्थापन झाल्या आहेत. जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळात शांतता रहावी यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी पोलिस ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत.
या शिवाय जिल्हाभरात गणेशोत्सवाच्या कालावधीत दररोज दिवसा व रात्रीच्या वेळी गस्त घातली जात आहे. त्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेव-ारे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, माधव जिव्हारे, मोरे यांचे पथक तैनात आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. तसेच आवश्यक तेथे छायाचित्रीकरण केले जात आहे.
दरम्यान, बंदोबस्ताच्या या व्यस्त कामातून वेळ काढून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी पोलिस ठाण्यात रक्तदान शिबीर आयोजित केले. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांनी या शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या जवानांसह काही गावातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. यामध्ये सुमारे ६० बाटल्या रक्त बाटल्या संकलित करून शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीला देण्यात आल्या आहेत.
या शिबिरासाठी सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष वाठोरे, वाघमारे, जमादार आकाश पंडितकर, आशिष उंबरकर, अनिल डुकरे, बाळासाहेब खोडवे, प्रदीप राठोड, सुधीर ढेंबरे, प्रकाश कांबळे, विजेश चव्हाण, सुरेश बुरसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.