

Sengaon Purna River Sand Mining
सेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उपशावर पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत रेती माफियांना जबर धक्का दिला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास, मौजे मांगवाडी (ता. सेनगाव) येथील पूर्णा नदीपात्रात विनापरवाना अवैधरीत्या रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस व महसूल पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला. मात्र, पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी पळ काढला.
या कारवाईदरम्यान चेन पोकलेन (अंदाजे किंमत ३० लाख रुपये), सुमारे २०० ब्रास अवैध रेती (किंमत १० लाख रुपये), रेती वाहतुकीसाठी नदीपात्रात तयार केलेला १५० ब्रास मुरुमाचा रस्ता (किंमत ९० हजार रुपये), असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शिवम शेषराव जाधव व गजानन तुरे (रा. ब्राम्हणगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस हवालदार कातकडे, चाटसे, वंजारे, शेखोकले तसेच महसूल मंडळ अधिकारी खंडेराव पोटे, केंद्रेकर, गवई, कांबळे आदींनी केली. या धडक कारवाईमुळे सेनगाव तालुक्यातील अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
पूर्णा नदीपात्रात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून चक्क रस्ताच तयार केला होता. जिंतूर तालुक्यातील वाळू लिलावाच्या पावत्या दाखवून सेनगाव तालुक्यातून खुलेआम वाळू वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांना नेमके कुठून बळ मिळते, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.