

Godavari River Illegal Sand Mining
पैठण : पैठण तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या दोघांविरुद्ध पैठण पोलिसांनी कारवाई करत १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या प्रकरणात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीतील वाळू उत्खननाचा कोणताही लिलाव झालेला नसल्याने, तसेच वाळूस मोठी मागणी असल्याचा फायदा घेत तस्करांकडून स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मध्यरात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने शनिवारी (दि. ३) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलनापूर ते आपेगाव मार्गावरील ज्ञानेश्वरवाडी रस्त्यावर पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव, पोकाॅ मुजस्सर पठाण, ढाकणे व खिळे यांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी हायवा (क्र. MH-48 AG 6267) अडवून ताब्यात घेतली.
याप्रकरणी वाहनचालक अलाउद्दीन इब्राहीम पठाण (रा. सोनवाडी, ता. पैठण) व भारत तात्यासाहेब खराद (रा. सोलनापूर, ता. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान १० लाख रुपये किंमतीचे हायवा वाहन व २५ हजार रुपये किंमतीची पाच ब्रास वाळू असा एकूण १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेश आटोळे करीत आहेत.