

Sengaon Attempted Theft Foiled
सेनगाव : सेनगाव शहरातील नागनाथ रोडवरील मयुरी मशिनरी या दुकानात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा डाव सेनगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. गुरूवारी (दि. ८) पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी दुकानातील महागडे विद्युत साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांची गस्त सुरू असल्याचे लक्षात येताच सुमारे १ लाख ३२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच टाकून चोरटे पसार झाले.
नागनाथ मंदिर रोडवरील परसराम नारायण देवकर यांच्या मालकीच्या मयुरी मशिनरी दुकानाचे लोखंडी साधनांच्या साहाय्याने शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील विद्युत मोटारी, विद्युत केबल तसेच इतर साहित्य चोरी करून ते आपल्या ताब्यातील अल्टो कंपनीच्या कारमध्ये भरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, रात्रगस्तीवर असलेले सेनगाव पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचा संशय चोरट्यांना आला. त्यामुळे त्यांनी चोरीचा मुद्देमाल तसेच वाहन तिथेच सोडून पलायन केले.
घटनास्थळी पोलिसांनी युनिकॉन कंपनीची मोटरसायकल (किंमत अंदाजे ६० हजार रुपये), प्रकाश कंपनीची ४ एमएम केबल (३१ हजार ५०० रुपये), प्रकाश कंपनीची २.५ एमएम केबल (१६ हजार २५० रुपये), प्रेसिडेंट कंपनीची ७.८ एमएम केबल (४ हजार रुपये), रेनॉल्ट कंपनीचा ३ एचपी ओपनवेल पंप (९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर (१२ हजार रुपये) असा एकूण १ लाख ३२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चोरटे पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तीन चोरटे शहरातील चोरीच्या दुचाकीवरून पसार झाले, तर एक चोरटा गोरेगाव रोडच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला.
या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. हा तपास नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे आणि पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
या रात्रगस्ती पथकात रवींद्र सुरदुसे, शहर बिट अमलदार सुभाष चव्हाण, संतोष जाधव, राम मार्कळ, अमोल चिकने यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.