

हिंगोली ः शहरालगत गंगानगर भागात बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
शहरालगत गंगानगर भागात दत्ता डोके यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या बाजूलाच सुधीर पाईकराव यांचे निवासस्थान आहे. मागील दोन दिवसांपुर्वी दोघांचेही कुटुंबिय घराला कुलुप लाऊन बाहेरगावी गेले होते. घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.
यामध्ये चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधुस केली. त्यानंतर डोके यांच्या घरातील कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम पळविली. त्यानंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या पाईकराव यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. या ठिकाणीही चोरट्यांनी दागिने पळविले. दोन्ही घटनामध्ये चोरट्यांनी 70 हजाराचा मुद्देमाल पळविला.
सोमवारी सकाळी डोके कुटुंबिय बाहेरगावाहून आले असतांना त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीकर, आशिष उंबरकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी दत्ता डोके यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांनी ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले असून मंगळवारी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.