

Pimpaldari flood youth dead
औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी येथे सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावातील तरुण नामदेव माधव रिठे (वय ३२) हा नदी पार करत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. गावकऱ्यांसह तरुण मंडळी, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुर्दुस, ओंकारेश्वर राजनीकर यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र, त्याचा मागमूस लागला नाही.
आज (दि. २३) सकाळी सुमारे सात वाजता पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ नदीच्या तीरावर नामदेव याचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती पोलीस पाटील विश्वनाथ रिठे यांनी तहसीलदार हरीश गाडे आणि पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी पुरभाजी जमरे, दशरथ खंदारे, नामदेव जमदाडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पिंपळदरी येथील स्मशानभूमीत नामदेव रिठे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तहसीलदार हरीश गाडे यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी अर्चना पटवे, तलाठी पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष संजय भुरके, सरपंच रत्नमाला भुरके, बापूराव घोंगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख खुदुस, ओंकारेश्वर राजनीकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेनंतर तहसीलदार हरीश गाडे आणि नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी शासनाकडून शक्य ती मदत तातडीने कुटुंबीयांना देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे २१ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून जाण्याची वेळ तीन महिलांवर आली होती. मात्र, गावातील एका तरुणाने धाडस दाखवत जीव धोक्यात घालून तिन्ही महिलांचे प्राण वाचवले.गावातील संगीता गजानन रिठ्ठे, लक्ष्मी गजानन रिठ्ठे आणि मंजुळा शेषराव रिठ्ठे या महिला उडीद तोडणीसाठी शेतात गेल्या होत्या. संध्याकाळी परतताना परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्याला अचानक पूर आला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या प्रवाहात वाहू लागल्या.
तेव्हा जवळच असलेल्या बंडू उर्फ रामजी माधव रिठ्ठे (वय ३५) या तरुणाने त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तत्काळ पाण्यात उडी घेतली. जीवाची पर्वा न करता त्याने महिलांना वाचवले. या त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे. बचाव मोहिमेदरम्यान बंडू रिठ्ठे यांचा मोबाईल फोन व त्यांनी विकत आणलेला बाजार पाण्यात वाहून गेला. त्याच्या धाडसाची दखल घेत समाजकार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी गावकऱ्यांना आवाहन करून बंडू यांना नवा मोबाईल घेण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष संजय भुरके, बंडू काळे, ज्ञानदेव डहाळके, शे. भुरुभाई, पोलीस पाटील विश्वनाथ रिठ्ठे, रुख्माबाई जळते, साहेबराव नाईक, नामदेव रिठ्ठे, संभाजी डुकरे, सखाराम डुकरे, पोलीस कर्मचारी शेख खुदुस, मंडळ अधिकारी अर्चना पटवे, तलाठी पुजारी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.