

Kalmanuri cloudburst
सिंदगी : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी परिसरात सोमवार (दि.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल अर्धा ते एक तास ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने झेंडू, सोयाबीन या नगदी पिकांसह कापूस व हळद पिकांवरही मोठा परिणाम झाला.
सिंदगी व परिसरातील बोल्डा, जांब, येहळेगाव गवळी, कोंढुर, डिग्रस व गोर्लेगाव या गावांमध्ये शेतकरी अनेक वर्षांपासून झेंडूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत झेंडूला प्रचंड मागणी असते. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी ‘नगदी पीक’ मानले जाते. झेंडूच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांची दिवाळी रंगतदार करीत असे. मात्र यंदा सततच्या पावसामुळे झेंडूची वाढ अडथळ्यात आली होतीच; त्यातच सोमवारी झालेल्या पावसाने उरलेसुरले पीकही पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.
झेंडू व्यतिरिक्त सोयाबीन पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने त्या कुजण्याची शक्यता आहे. कापूस व हळद पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
“आम्ही वर्षभर झेंडू व सोयाबीन पिकांवर खर्च करून मोठ्या आशा बाळगल्या होत्या. आता ढगफुटी सदृष्य पावसाने सारेच पिकं नष्ट झाले. दिवाळीत कुटुंब कसे चालवायचे, कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे,” असे शेतकरी हतबल होऊन सांगत होते.
सिंदगी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना योग्य त्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि तालुका कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी करतील,अशी माहिती सूत्रांकडून समजते.