हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा लाकडाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली. यामध्ये अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ९ जणांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात आज (सोमवार) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे.
सेनगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे लहान मुलास चापट मारल्याच्या कारणावरून बाळू राठोड व प्रविण राठोड यांच्यात वाद सुरु झाला होता. त्यानंतर एका महिलेने मागील आठ दिवसांपासून बाळू राठोड यास शिवीगाळ करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे त्याने शनिवारी सायंकाळी त्या महिलेस जाब विचारला. यावेळी शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने हाणामारीला सुरवात झाली. या हाणामारीत नऊ जणांनी मिळून बाळू राठोड याच्या डोक्यात व पाठीवर लाकडाने वार केले. भांडण सोडविण्यासाठी बाळू यांचे प्रेमदास व रोहिदास मध्ये पडले असता, त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाळू राठोड यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतांनाच रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रेमदास राठोड यांनी सोमवारी पहाटे गोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रविण संतोष राठोड, संतोष रुपसिंग राठोड, सचिन संतोष राठोड, बबन शामराव चव्हाण यांच्यासह पाच महिलांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक संतोष आघाव, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने पाच जणांना अटक केली असून, उर्वरीत आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :