

हिंगोली : शहरात पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्ती केल्यानंतर आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्या सजग नागरिकांचा शनिवारी शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या या गांधीगिरीची शहरात चर्चा रंगली आहे.
कारवाईचा बडगा अन् आता कौतुक
जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश दिले आहेत. 21 एप्रिल रोजी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 511 वाहनधारकांवर कारवाई करून 5 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला होता. या कडक कारवाईनंतर आता नागरिक स्वतःहून हेल्मेटचा वापर करताना दिसत आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या या नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वाहतूक शाखेने शनिवारी सत्कार उपक्रम राबवला.
यावेळी पोलीस निरीक्षक शरद मरे, जमादार गजानन राठोड, शिवाजी पारस्कर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकाचौकांत हेल्मेटधारी चालकांना थांबवून त्यांचे स्वागत केले. “सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट केवळ सक्ती म्हणून न वापरता ती आपली गरज समजावी. दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास टाळावा आणि चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करावा,“ असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी केले आहे.