

उल्हासनगर: रायता जवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील चौकांमध्ये नाकेबंदी करून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
कल्याणहून मुरबाडकडे जाणाऱ्या एका काळ्या-पिवळ्या इको गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती समोरून येणाऱ्या मिक्सर ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.
दोन दिवसांत 13 विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र अहिरे, गोरख चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ काळे, लक्ष्मण पांडर, गणेश शेलार, संजय बेंद्रे, संतोष भोईर, मनोज काळे, नाना आव्हाड, सुनील सकपाळ, रणजित खोत, परेश वारंग आणि जानू वटास यांच्या पथकाने ही कारवाई केली.
513 चालकांवर दंडात्मक कारवाई
या मोहिमेत एकूण 513 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, वाहनांची वैध कागदपत्रे नसणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, ट्रिपल सीट प्रवास, काळ्या काचांचा वापर, खाजगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि मद्यपान करून गाडी चालवणे अशा विविध नियमांच्या उल्लंघनाचा समावेश आहे.
या संपूर्ण कारवाईतून एकूण 4,30,350 रुपयांचा दंड ऑनलाईन पद्धतीने वसूल करण्यात आला आहे. रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भविष्यातही अशीच कारवाई सुरू राहील, असे उल्हासनगर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी सांगितले.