

Youth Killed In Hatta
हट्टा (ता. वसमत) : येथील बाजार चौकातील खंडोबा मंदिरासमोर ३१ मेरोजी रात्री नऊच्या सुमारास रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या मारहाणीत चाकू, लाठ्या वापर करण्यात आला. यात रुद्र प्रदीप दस्तके (देशमुख)यांचा चाकूचा वार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हट्टा परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे.
घटनेत प्रविण कोराजी देशमुख (दस्तके), प्रदीप कोराजी देशमुख (दस्तके) व शुभम प्रसाद देशमुख (दस्तके) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या गटातील प्रणव प्रल्हाद भवर, योगेश बाळासाहेब भवर, पंकज प्रल्हाद भवर व प्रल्हाद लक्ष्मण भवर हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमागे १७ मे रोजी पिंपळगाव (कुटे) येथील वाळू घाटावर झालेल्या जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा परिसरात आहे. त्या वेळी दोन्ही गटांतील काही जण जखमी झाले होते. मात्र, प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. त्याच वादाचे पर्यवसान रविवारी रात्रीच्या रक्तरंजित संघर्षात झाला .
मृत रुद्र प्रदीप दस्तके यांचे १ जून रोजी पत्नीसमवेत तिरुपती दर्शनासाठी जाण्याचे नियोजन होते. त्यासाठी आरक्षणही करण्यात आले होते. मात्र, दर्शनाच्या एक दिवस आधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. निलाभरोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हट्टा येथे तैनात करण्यात आला होता
मृत रुद्र दस्तके शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे