Maha Shivratri 2024 : औंढा नागनाथ येथे हर हर महादेवचा गजर; ५०० केसर आंब्यांची आरास

Maha Shivratri 2024 : औंढा नागनाथ येथे हर हर महादेवचा गजर; ५०० केसर आंब्यांची आरास

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त आज (दि.८) सुमारे ५०० आंब्याने नागनाथाची आरास करण्यात आली. पहाटे दीड वाजेपर्यंत महापूजा संपल्यानंतर दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंत ९० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. हर हर महादेव, बम बम भोले च्या गजराने मंदिर परिसर दणाणून गेला होता. Maha Shivratri 2024

औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री केसर आंब्यांची आरास करण्यात आली. शेतकरी अनिल देशमुख यांनी आंबे उपलब्ध करून दिले. त्यानंतर साडेबारा वाजल्यापासून महापूजेला सुरवात करण्यात आली. संस्थानचे पदसिध्द सल्लागार आमदार संतोष बांगर, अध्यक्ष तथा तहसीलदार हरिश गाडे, मुख्य पुजारी तुळजादास भोपी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पहाटे दीड वाजेपर्यंत पूजा झाली. त्यानंतर दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. हर हर महादेव, बम बम भोलेचा भाविकांकडून गजर केला जात होता. साधे दर्शन व विशेष पास दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. Maha Shivratri 2024

पहाटेपासूनच भाविक मिळेल, त्या वाहनाने औेंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी येत होते. दुपारी ४ वाजेपर्यंत ९० हजारपेक्षा  अधिक भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या सोयीसाठी बॅरीकेट्स लावण्यात आले. तसेच ऑनलाईन दर्शनासाठी तीन स्क्रिन देखील लावण्यात आल्या आहेत. भाविकांना पाच क्विंटल साबुदाना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. नागनाथ मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

नागनाथ मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या शिवाय सध्या वेशातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक औंढा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. भाविकांच्या वाहतुकीसाठी विशेष बसगाड्या देखील सोडण्यात आल्या होत्या. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी औंढा नागनाथ येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

महाशिवरात्री यात्रेचे रथोत्सव मुख्य आकर्षण आहे. सोमवारी रात्री दहा वाजता रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नागनाथ मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जाणार आहे. यावेळी सुमारे ७० हजार पेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news