

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवार, दि. 2 जुलै 2026 रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पहाटे 1. 20 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा, तर सकाळी 10.14 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेत जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. प्रशासनाने नागरिकांना भूकंपापूर्वी, भूकंपाच्या वेळी आणि भूकंपानंतर सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. घरांचे भूकंपरोधक बांधकाम करणे, जड वस्तू सुरक्षितपणे बसविणे, आपत्कालीन वस्तुसंच तयार ठेवणे तसेच कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्क व स्थलांतर आराखडा तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भूकंपाच्या वेळी शांत राहून मजबूत टेबल किंवा पलंगाखाली आसरा घ्यावा, खिडक्या, आरसे व जड वस्तूंपासून दूर राहावे, लिफ्टचा वापर टाळावा आणि कंपन थांबल्यानंतरच सुरक्षितपणे बाहेर पडावे. तसेच खुल्या जागेत असल्यास इमारती, झाडे, विजेचे खांब व तारा यांच्यापासून दूर राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूकंपानंतर मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये प्रवेश करू नये, आफ्टरशॉक्सची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहावे. अफवा पसरवू नयेत आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना संयम राखून अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.