

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात झालेल्या खोल केंद्राच्या तीव्र भूकंपाचे हादरे पाकिस्तान, उत्तर भारत आणि मध्य आशियामध्ये जाणवले. आज सायंकाळी अफगाणिस्तानच्या हिंदूकुश भागात ६.२ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. हा भूकंप भारतीय वेळेनुसार (IST) संध्याकाळी ७:०४ वाजता २१५ किलोमीटर खोलीवर झाला. याचे हादरे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांत जाणवले. तूर्तास कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
या भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य अफगाणिस्तानमधील कलाफगनपासून सुमारे ८१ किमी अंतरावर होता. याचे हादरे अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्ये जाणवले.भूकंपाचे केंद्र जमिनीखाली खूप खोलवर असल्याने हे हादरे मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर जाणवले.
भूकंपामुळे पाकिस्तानच्या उत्तरेकडील स्वात जिल्ह्यातील रहिवासी घाबरून घराबाहेर पडले, मात्र तिथेही तातडीने कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. स्थानिक रहिवासी दानियाल अहमद यांनी रॉयटर्सला सांगितले की, "येथे स्वातमध्ये हादरे खूप तीव्र होते आणि ते काही वेळ टिकले." भूकंपानंतरच्या धक्क्यांच्या (आफ्टरशॉक्स) भीतीने लोक घराबाहेर जमा झाले होते, यावेळी महिला आणि लहान मुले रडताना दिसली, असेही त्यांनी सांगितले.याचे हादरे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांत जाणवले. तूर्तास कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप हा एक तीव्र भूकंप मानला जातो जो गंभीर नुकसान करू शकतो. परंतु, त्याचा प्रभाव भूकंपाची खोली, स्थान आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो.
याआधी २७ जून रोजी सकाळी ११:३८ वाजता (IST) भारताच्या हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात ३.२ रिश्टर स्केलचा कमी खोलीवरील भूकंप नोंदवला गेला. भूकंपाचा उगम ५ किमी खोलीवर झाला होता आणि त्याचा केंद्रबिंदू भूकंपप्रवण हिमालयाच्या पट्ट्यातील धरमशालेपासून सुमारे २२ किमी उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेला होता. हा कमी तीव्रतेचा भूकंप असल्याने कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.
युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) च्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पाकिस्तानात चार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यातील सर्वात तीव्र धक्का ५.५ रिश्टर स्केलचा होता.हा सर्वात शक्तिशाली धक्का शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:३६ वाजता जाणवला. हा भूकंप ५.५ रिश्टर स्केलचा होता आणि त्याचे केंद्र जमिनीखाली ४० किलोमीटर खोलीवर, पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागातील coordinates ३०.२७१° उत्तर अक्षांश आणि ६९.७३३° पूर्व रेखांशावर होते. येथेही तातडीने कोणत्याही जीवितहानीची किंवा नुकसानीची नोंद नाही. EMSC ने या चारही भूकंपांच्या नोंदींची पडताळणी करून त्यांना दुजोरा दिला आहे.