Yavatmal Earthquake : मारेगाव तालुक्यात भूकंप; सुदैवाने कोणतीही जीवित-वित्तहानी नाही

Earthquake
Earthquakepudhari
Published on
Updated on

यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील नवरगाव प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या सुरला, गोधनी आणि केगाव परिसरात आज मंगळवारी (दि. ९) दुपारी पाच वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० इतकी मोजली गेली आहे. सुदैवाने, या भूकंपामुळे परिसरामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

भूकंपाची तीव्रता अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर अजिबात विश्वास ठेवू नये आणि असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी शांत राहावे. जर तुम्ही इमारतीमध्ये असाल, तर बाहेर पळण्याऐवजी घरातील मजबूत टेबल, डेस्क किंवा भिंतीच्या आतील बाजूस सुरक्षित आसरा घ्यावा. भूकंप चालू असताना लिफ्टचा वापर पूर्णपणे टाळावा आणि धक्के थांबल्यानंतरच सुरक्षितपणे इमारतीबाहेर पडावे. यासोबतच, घरातील वीज, गॅस आणि इतर उपकरणांची काळजीपूर्वक तपासणी करावी.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे आणि कोणतीही महत्त्वाची माहिती किंवा आपत्कालीन प्रसंग असल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news