

पूर्णा : शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट गाढवांच्या धुडगूसमुळे शुक्रवारी (दि.9) सायंकाळी भीषण अपघात घडला. बसस्थानकासमोरील हॉटेलजवळ अचानक गाढवांत सुरू झालेल्या लाथाळी व धावपळीने प्रवासी ऑटो पलटी झाला. यात क्रांतिनगर येथील शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला.
शेख कैफ कलिम (वय 12) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने मोकाट गाढवे फिरत होती. अचानक काही गाढवांत एकमेकांवर धाव घेणे, लाथा मारणे सुरू झाले. यावेळी प्रवासी ऑटो तेथून जाताना गाढवांचा कळप समोर आल्याने चालकाचा ताबा सुटला व ऑटो पलटला. अपघातात ऑटोतील शेख कैफ कलिम हा खाली पडून ऑटोखाली अडकला. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर काहीकाळ परिसरात गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी मुलास बाहेर काढले. त्याला प्रथम पूर्णेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान, पूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून तिची वाहतूक करण्यासाठी काही लोकांनी मोठ्या प्रमाणात गाढवे खरेदी केल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.
या गाढवांवर बारदान टाकून त्यात वाळू भरून शहरात विक्रीस आणली जाते. हा अवैध व्यवसाय अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू असून रेती वाहतूक करणाऱ्यांना महसूल व पोलीसांची कोणतीही भीती नसल्याचे चित्र आहे. रेतीची वाहतूक पूर्ण झाल्यानंतर ही गाढवे शहरात मोकाट सोडून दिली जातात. परिणामी शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ व वर्दळ भागात गाढवांची फौज बिनधास्त फिरताना दिसते. अनेकदा ही गाढवे एकमेकांवर तुटून पडतात, लाथाळी करतात. विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर गाढवे धावत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पालिकेच्या उदासीनतेवर नागरिकांचा रोष
मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीही अशा घटना घडूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोकाट गाढवांची ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून अपघातांना थेट निमंत्रण ठरत आहे. शहरातील नागरिकांनी मोकाट गाढवांवर तात्काळ बंदोबस्त करावा, अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासह दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.