

सेनगाव ः सेनगाव ते रिसोड मार्गावर वटकळी शिवारात पोलिसांनी एका कारसह गुटख्याची पोती असा 6.38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्ती विरुध्द शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर ते रिसोड मार्गावर एका कारमधून गुटख्याच्या पोत्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार ओमनाथ राठोड, आंबादास गायकवाड, सुभाष चव्हाण, अंभोरे यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता वटकळी शिवारात थांबून वाहनाची तपासणी सुरु केली होती. यामध्ये पहाटे दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास रिसोड कडून येणारी एक कार पोलिसांनी थांबवली.
यावेळी पोलिसांनी कारचालक शेख मकसुद याची चौकशी सुरू केली असता त्याने कारमधील पोत्यांबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पोती उघडून पाहिले असता त्यात गुटखा आढळून आला. यामध्ये व्हि वन बिग तंबाखू, विमल पान मसाला, प्रिमीयर आरएमडी, एम. सेटेंड तंबाखू गोल्ड, प्रिमीयम पानपराग आदी प्रकारच्या गुटख्याचा समावेश होता.
पोलिसांनी गुटखा व कार असा 6.38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाण्यात आणला. याप्रकरणी जमादार ओमनाथ राठोड यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी शेख मकसुद (रा. वरुडवेस जिंतूर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी शेख मकसुद याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने रिसोड येथून भरलेला गुटखा जिंतूरकडे विक्रीसाठी नेत असल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. तर आता रिसोड येथून कोणाकडून गुटखा खरेदी केला याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.