

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांत बसमध्ये चढत असताना व उतरताना महिलांच्या गळ्यातील, पर्समधील दागिने पळविणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. त्यांच्याकडून 11.07 तोळे सोन्याचे दागिने व 16 तोळ्याचे चांदीचे दागिने अशा पाच लाख 68 हजारांचा ऐवज जप्त केला.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यात अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, कंधार हदगाव, बिलोली, अर्धापूर व लोहा बसस्थानकात महिला बसमध्ये चढत असताना व बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिला प्रवासी असल्याचा बहाणा करत अत्यंत शिताफीने गळ्यातील, पर्स मधील गंठण चोरत गेल्या अनेक दिवसांपासून ही टोळी कार्यरत होती मात्र, प्रत्येक वेळेस ही टोळी काम फत्ते करण्यात यशस्वी होत. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत या महिला चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या पथकाने पूनम आतीष हातवळणे (वय 29), राखी हीरा हातवळणे (वय 40), महेश दिनाजी गायकवाड (वय 38), महेश दिनाजी गायकवाड (वय 38), शन्नु राजू हातवळणे (वय 50) अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता अनेक बसस्थानकांवर चो-या केल्याची कबुली या महिलांच्या टोळ्यांनी दिली.
या टोळीकडून 11.07 तोळे सोन्याचे दागिने व 16 तोळ्याचे चांदीचे दागिने अशा पाच लाख 68 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनास कामार यांनी कौतुक केले आहे.