

Villagers Lock School Hingoli
सेनगाव : सेनगाव तालुक्यातील धोतरा येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक असल्याने संतप्त शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी (दि. ३०) सकाळी शाळेला कुलुप ठोकले. मात्र, या आंदोलनाची माहिती मिळताच केंद्र प्रमुखांनी तीन दिवसांसाठी एकशिक्षक नियुक्त केला आहे. मात्र, तीन दिवसानंतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा समितीसह गावकऱ्यांनी दिला आहे.
सेनगाव तालुक्यातील धोतरा येथे इयत्ता पाचवी पर्यंत शाळा असून या ठिकाणी सुमारे ४० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या पाच वर्गासाठी शाळेच्या दोनच खोल्या असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. एवढेच नव्हे तर शाळेमध्ये केवळ एकच शिक्षक कार्यरत आहेत. एकाच शिक्षकावर पाच वर्ग शिकविण्याचा भार असल्यामुळे प्रत्येक वर्गाकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.
दरम्यान, शाळा सुरु होण्यापुर्वी या ठिकाणी एका शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी केली होती. मात्र शाळेत शिक्षकाची नियुक्ती झालीच नसल्यामुळे संतप्त गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शाळेला कुलुप ठोकले. यावेळी नागनाथ तायडे, राधा गायकवाड,निता तायडे, तुकाराम ढोणे, संतोष तायडे, नानाभाऊ थिटे, सुशीला थिटे, बाबाराव लाटे, राम पाटील यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
दरम्यान, शाळेला कुलुप लाऊन आंदोलन केले जात असल्याची माहिती मिळताच केंद्रप्रमुख गजानन पायघन यांनी तातडीने गावात जाऊन शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर तीन दिवसांसाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. तीन दिवसांत एका शिक्षकाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर दोन ते तीन तासानंतर शाळेचे कुलुप उघडण्यात आले.