

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे एका वृद्ध महिलेची दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणुक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या महिलेने शनिवारी गोरेगाव पोलिसांकडे धाव घेऊन रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही त्या दोन भामट्यांचा शोध सुरु केला आहे. या शिवाय पोलिस ठाण्यांतर्गत सर्व गावातील पोलिस पाटील यांना माहिती देऊन दागिने उजळून देण्यासाठी आलेल्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे दोन भामटे शुक्रवारी दुपारी गावात आले होते. यावेळी त्या भामट्यांनी गावातील एका जेष्ठ महिला वच्छलाबाई कांबळे यांच्या घरी जाऊन दागिने उजळून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांना चांदीचे कडे व कोपरे उजळून देण्यासाठी दिले. त्यानंतर भामट्यांनी चांदीचे दागिने उजळून दाखविले अन काही वेळानंतर ते भामटे पळून गेले.
मात्र दागिन्यांचे वजन कमी भरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला. त्यावरून त्यांनी दागिन्यांचे वजन केले असता ते दागिने पाचशे ग्राम वजनाचे असतांना उजळल्यानंतर त्याचे वजन अडीचशे ग्रामच भरले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबाने शनिवारी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून अर्ज दाखल केला.
दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती, राहुल मैंदकर यांच्या पथकाने गावात जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात दोन भामटे दिसून आले. पोलिसांनी त्यांचे फुटेज घेतले आहे. या सोबतच गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत सर्व गावांमधील पोलिस पाटील यांना याबाबत सुचना दिली असून गावात दागिने उजळून देणारे भामटे आल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन गोरेगाव पोलिसांनी केले आहे.