

Hingoli Kalmanuri taluka gambling raid
आखाडा बाळापूर : जनावराच्या गोठ्यात गोलाकार बसून रंगलेल्या पत्त्याच्या डावावर बाळापुर पोलिसांनी छापा टाकला. यात 10 पैकी 8 जुगारी पोलिसांच्या हाताला लागले तर दोघेजण पसार झाले. पोलिसांनी यावेळी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 1 लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील अंबादास बालाजी सावंत यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून बाळापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार फौजदार विष्णुकांत गुट्टे यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके व त्यांच्या सहकारी पथकाने गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोठ्यावर छापा मारला.
यावेळी काहीजण झन्ना-मन्ना नावाचा जुगार पैसे टाकून खेळताना आढळून आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश अशोक गोटके यांच्या फिर्यादीवरून रुपेश अशोक वानखेडे, सुभाष अशोक डोके, दिलीप सुरेश सावंत, विलास मारोतराव वाघमारे, अविनाश उर्फ बाळू दत्तराव सावंत, अंबादास बालाजी सावंत, प्रदीप मारोतराव सावंत, अनिल बळीराम गिरी, सतीश माधवराव सूर्यवंशी, समाधान नरवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 पैकी 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेजण फरार असल्याचे पीएसआय गणेश गोटके यांनी सांगितले.