

Hingoli News
हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिरसम बुद्रुक कृषी उत्पन्न बाजार समितीचे समायोजन करण्यात आल्यामुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी काढले असून याबाबत राजपत्रात अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांची सुमारे अडीच वर्षांपूर्वी निवड झाली होती. हिंगोली बाजार समिती कार्यक्षेत्रामध्ये १२० गावे आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून या समितीकडे पाहिले जाते. हळद या पिकासह सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. दरम्यान २००८ मध्ये हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ही बाजार समिती स्थापन करण्यात आली. या बाजार समितीमध्ये ५६ गावे जोडण्यात आली होती. मात्र बाजार समितीच्या स्थापनेपासून शेतमाल खरेदी विक्रीची उलाढाल म्हणावी तशी होत नव्हती. याशिवाय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी भौतिक सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे शेतकरी हिंगोली बाजार समितीकडेच शेतमाल विक्रीसाठी येत असल्याचे चित्र होते.
दरम्यान, सिरसम बुद्रुक बाजार समिती अंतर्गत येणारी ५६ गावे हिंगोली बाजार समितीला जोडावी, असा ठराव बाजार समितीने घेतला होता. याशिवाय हिंगोली बाजार समितीने २०२३ मध्ये सिरसम बुद्रुक बाजार समितीमधील गावे समायोजन करण्यास ना हरकत देऊन ठरावही घेतला होता. त्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आक्षेप मागवले होते. या आक्षेपावर जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या उपस्थितीत सुनावणी देखील घेण्यात आली. या सुनावणीमध्ये आक्षेपाचे सबळ कारण नसल्यामुळे आक्षेप फेटाळून लावण्यात आले होते. दरम्यान यानंतर जिल्हा उपनिबंधक फुफाटे यांनी सिरसम बाजार समिती अंतर्गत ५६ गावे हिंगोली बाजार समितीमध्ये समायोजन करून हिंगोली बाजार समिती बरखास्त करण्याचे आदेश काढले आहेत. याबाबतची अधिसूचना देखील राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे बाजार समिती बरखास्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार आता हिंगोली बाजार समितीअंतर्गत १७६ गावांचा समावेश असणार आहे. यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली बाजार समिती बरखास्त केल्यानंतर या ठिकाणी प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक म्हणून कार्यालय अधीक्षक बी. बी. पठाडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार आजपासून फुफाटे या बाजार समितीचा पदभार स्वीकारणार आहेत.