हिंगोली : जनावरे चोरणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद

हिंगोली
हिंगोली

हिंगोली पुढारी वृत्तसेवा : मागील काही महिन्यात सेनगाव, नर्सी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या काही गावांमधून शेतकर्‍यांची जनावरे चोरीला गेल्याची घटना घडल्या होत्या. (जि.हिंगोली ) याप्रकरणी तपासाचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्‍लू यांच्या पथकाने तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून जनावरे चोरणार्‍या अंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले. तब्बल ५ लाख ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

माहितीनुसार, सेनगाव, नर्सी पोलीस ठाण्यात शेतकर्‍यांचे पशूधन चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्‍लू, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठ्ठल काळे, महादू शिंदे, ज्ञानेश्‍वर पायघन, हरीभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दिपक पाटील, दत्ता नागरे यांचे पथक नेमण्यात आले होते. मलपिल्‍लू यांनी घटनास्थळी व परिसरात भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धतीचा अवलंब करून गोपनीय माहितीच्या आधारे राजू देवराव गव्हाणे, नामदेव देवराव गजभार, शेषराव धर्मा वंजारे, रामेश्‍वर सिताराम महाजन (रा. कळमेश्‍वर ता. मालेगाव जि. वाशिम) यांनी जनावरे चोरल्याचे उघड झाले. त्यानंतर पथकाने आरोपींच्या गावी जावून सापळा रचून राजु गव्हाणे, नामदेव गजभार, शेषराव वंजारे यांना ताब्यात घेतले. सेनगाव व नर्सी नामदेव तसेच कळमनुरी पोलीस ठाण्याहद्दीतून जनावरे चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून जनावरे विक्रीतून मिळालेले ८३ हजार रूपये, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, पाच लाख असा एकूण 5 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

हिंगोली : मलपिल्‍लू पथकाची चमकदार कामगिरी

मागील चार महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्‍लू यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठांनी कौतुक केले. आता पुन्हा जनावरे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news