

High Court quashes decision to disqualify candidate due to name discrepancy; Relief for the candidate
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा टव्हा या गावातील उमेदवार रामप्रसाद मोहनराव शेळके याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, त्याची पुढील वैद्यकीय चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या या याचिकेवर ८ एप्रिल रोजी खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील रामप्रसाद शेळके याने एसएससी मार्फत घेण्यात आलेल्या कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत १०६.३७ गुण मिळवून लेखी परीक्षेत मोठे यश संपादन केले होते. त्यानंतर त्याने शारीरिक चाचणी देखील यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली होती. मात्र, १ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या कागदपत्र पडताळणीत त्याला धक्का बसला.
ऑनलाईन अर्जावर त्याने केवळ रामप्रसाद असे नाव लिहिले होते, तर दहावीच्या प्रमाणपत्रावर शेळके रामप्रसाद मोहनराव असे पूर्ण नाव होते. याच एका तांत्रिक मुद्द्यावर त्याला अपात्रतेचे पत्र देण्यात आले होते. प्रशासनाच्या या निर्णयाला रामप्रसादने अॅड. अक्षय आनंद मस्के यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती आर. आय. चागला आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठणा यांच्या खंडपीठाने प्रशासनाचा अपात्रतेचा निर्णय रद्दबातल ठरवला. ज्यामध्ये उमेदवाराला ऑनलाईन अर्जात नाव सुधारण्याची संधी देण्यात यावी, रामप्रसादला वैद्यकीय परी-क्षेसाठी पात्र उमेदवार म्हणून बोलावण्यात यावे, जर उमेदवार वैद्यकीय परीक्षेत पात्र ठरला आणि त्याच्या प्रवर्गातील जागा रिक्त असतील, तर या आदेशाच्या दिनांकापासून चार आठवड्यांच्या आत त्याचे नाव शिफारस यादीत समाविष्ट करून नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश देण्यात आले आहेत.