

छत्रपती संभाजीनगर: रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्तावित जागांचे मनपाकडून सुरू असलेले सर्वेक्षण नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रशासनाने त्याला आणखी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. सुमारे ४२०० लाभार्थीच्या जागांची प्रत्यक्ष पाहणी सुरू असून, यासाठी दहा पथके काम करत आहेत.
शहरात महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेतील जागांचे सर्वेक्षण सुरू आहे. या योजनेतील अर्जाची पडताळणी अधिक काटेकोरपणे करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. सुरुवातीला १६ ते १८ मार्चदरम्यान सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र लाभार्थीची संख्या मोठी असल्याने आणि विविध भागांतील स्थळपाहणीस वेळ लागत असल्याने काम अपूर्ण राहिले. त्यामुळे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तीन दिवस देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही अर्जदारांच्या नावाने विविध कागदपत्रे तयार करून प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. तसेच काही आजी-माजी नगरसेवकांनीही लाभमिळवण्यासाठी प्रस्ताव दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मनपाने सर्व अर्जदारांच्या जागांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सध्या मनपाची पथके शहरातील विविध भागात जाऊन लाभार्थीच्या जागांची मोजणी, मालकीची पडताळणी आणि कागदपत्रांची तपासणी करत आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.
सर्वेक्षणानंतर पात्र लाभार्थीची यादी
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांच्या जागांची खातरजमा करण्यासाठी मनपाने विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध भागांत दहा पथके नियुक्त करण्यात आली असून, ती प्रत्यक्ष स्थळावर जाऊन जागेची उपलब्धता, मालकीची कागदपत्रे आणि अर्जातील माहितीची पडताळणी करत आहेत. सुरुवातीला तीन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र अर्जाची संख्या मोठी असल्याने सर्वेक्षणाची मुदत वाढवण्यात आली आहे. प्रशासनाच्या या प्रक्रियेनंतरच अंतिम पात्र लाभार्थीची यादी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.