

वसमत : वसमत शहर आणि परिसरात लिंब, आंबा आणि इतर फळझाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल सुरू असून, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. विशेष म्हणजे शहरातील 16 पैकी 14 लाकूड कटाई मशीनला वनविभागाची परवानगी आहे की नाही, हा संशोधनाचा विषय बनला आहे. प्रत्येक मशीनवर परवानगी नसलेल्या झाडांचा हजारो घनफूट साठा पडून असताना वन अधिकारी मात्र सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.
शासनाच्या नियमानुसार सुबाभूळ, बाभूळ, निलगिरी, बांबू, चंदन आणि सरू वगळता इतर झाडांच्या तोडीसाठी परवानगी आवश्यक असते. मात्र, विटाभट्ट्यांसाठी लिंब आणि फळझाडांचा सर्रास वापर होत आहे. 2023 मध्ये केवळ दोन नवीन मशीनला ना हरकत प्रमाणपत्र मिळाले असून, उर्वरित 14 जुन्या मशीनबाबत संशय व्यक्त होत आहे.
याबाबत वनपालांशी संपर्क साधला असता, मला कार्यालयातून काहीच माहिती नाही, असे उडवाउडवीचे उत्तर त्यांनी दिले. तर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी परवानगीविना साठा आढळल्यास जप्त केला जाईल, असे सांगितले. मात्र, डोळ्यासमोर अवैध साठा असताना कारवाई का होत नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.