

Gutkha Smuggling: Gutkha worth 17.90 lakhs and Scorpio seized after 3 hours of blockade
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : नांदेडकडून विदर्भाकडे स्कॉर्पिओतून होणारी गुटख्याची मोठी तस्करी पोलिसांनी उधळून लावली आहे. हिंगोलीलगतच्या खटकाळी बायपासवर शनिवारी सकाळी तब्बल तीन तास नाकाबंदी करून स्थानिक गुन्हे शाखा आणि हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने १७लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व स्कॉर्पिओ वाहन जप्त केले.
नांदेडहून विदर्भाकडे गुटख्याची मोठी खेप जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून वाहनचालक पळून जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेत शनिवारी सकाळी ६ वाजेपासून खटकाळी बायपासवर साध्या आणि गणवेशातील कर्मचाऱ्यांनी कडक नाकाबंदी केली.
सकाळी ९ च्या सुमारास आलेली एक संशयित स्कॉर्पिओ पोलिसांनी अडवली. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची झडती घेतली असता, त्यात सुगंधित पान मसाला आणि गुटख्याची पोती आढळून आली.
पोलिसांनी तातडीने गुटखा आणि स्कॉर्पिओ असा एकूण १७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा केला. हा गुटखा नांदेडहून आणला असून तो विदर्भात पोहचवला जाणार असल्याची माहिती चालकाने प्राथमिक चौकशीत दिली आहे.
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी
पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर अधीक्षक कमलेश मीना आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात हिंगोली ग्रामीणचे निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, उपनिरीक्षक राहुल घुले, श्रीदेवी वाग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडितकर, बापूराव चव्हाण, सुधीर ढेंबरे, नंदू जाधव, विष्णू चव्हाण, राजू गुठे, शंकर गायकवाड, इडळे तसेच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव आणि धनंजय क्षीरसागर यांचा समावेश होता.