

Focus on sanitation planning at Ranjangaon; Resolution of a garbage-free village
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव शे.पू. ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी (दि. १७) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि 'नागार्जुन एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट'च्या स्वच्छता चमूची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीत गावातील दैनंदिन कचरा संकलन, कार्यपद्धती आणि नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सेवा संकल्प अभियान व घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार ओला, सुका, सॅनिटरी आणि घरगुती धोकादायक कचरा अशा चार पद्धतींनी कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि वापरकर्ता शुल्क संकलन करण्याबाबत चर्चा झाली.
ट्रस्टच्या स्वच्छता चमूने गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामपंचायत व स्वच्छता चमूच्या समन्वयातून गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. याप्रसंगी प्रशासक अशोक घोडके, ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई, बाजार समितीचे संचालक दीपक बडे, माजी जि. प. सदस्य दत्तू हिवाळे, बाबूराव हिवाळे, भीमराव कीर्तिकर, ट्रस्टच्या संचालिका किरण बोराडे, संचालक साहिल तूरकर, किशोर म्हस्के आदी उपस्थित होते.