

Farmer's 4 acres of land seized by using fake Aadhaar card and photo
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील शेतकऱ्याच्या दोन गटांतील एकूण चार एकर जमिनीचे बनावट दस्ताऐवज तयार करून परस्पर विक्री करणाऱ्या चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
मसोड येथील एका सातव नावाच्या शेतकऱ्याची मसोड शिवारातील गट क्रमांक ५३ मध्ये दोन एकर जमीन आहे. तसेच गट क्रमांक ७८ मध्ये दोन एकर जमीन आहे. सदर चार एकर जमीन ते वहिती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. या जमीन विक्रीबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारचा करारनामा केला नाही. तसेच बनावट दस्ताऐवज तयार करून खरेदीखत, चौघांवर गुन्हा दाखल.
जमिनीची विक्रीही केली नाही. दरम्यान, सदर गावातील काही व्यक्तींनी या दोन्ही गटांतील बनावट कागदपत्रे तयार केली. त्यांनतर हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात या जमिनीचे खरेदीखत नोंदविले. या खरेदीखत नोंदवत असताना त्यांनी जमिनीच्या मालकाचे छायाचित्र व आधारकार्डही तयार करून लावले.
या कागदपत्रांच्या आधारावर ३१ जानेवारी रोजी या चार एकर जमिनीचे खरेदीखत नोंदविण्यात आले होते. सदर प्रकार मूळ मालक असलेल्या सातव यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने सह दुय्यम निबंधक कार्यालय गाठून खरेदीखताच्या प्रती काढल्या.
यामध्ये त्यांची जमीन परस्पर विक्री करण्यात आल्याचे दिसून आले. यावर त्यांनी सहदुय्यम निबंधक संजय सुंकवाड यांना याबाबत माहिती दिली. यावरून सुंकवाड यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यावरून पोलिसांनी कान्होपात्रा भालेराव, माधव भालेराव (रा. मसोड), शाम सोळंके (रा. कळमनुरी) यांच्यासह अन्य एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक वाघमारे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शंकर ठोंबरे, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.