

हिंगोली : औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर परिसरात रथोत्सवाच्या वेळी महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात आता औंढा नागनाथ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याच्या सूचना औंढा नागनाथ संस्थानला दिल्या आहेत. जागेच्या कारणावरून हाणामारी झाली असावी अशी शक्यता संस्थान प्रशासनाने व्यक्त केली आहे.
औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या रथोत्सवाच्या वेळी बुधवारी दुपारपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. मराठवाड्यासह बाहेर राज्यातील भाविकदेखील यावेळी हजर होते. मंदिराच्या परिसरात सुमारे 1 लाखापेक्षा अधिक भाविक आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रथोत्सवाच्या वेळी झालेली गर्दी पाहता पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नव्हती.
दरम्यान, रथोत्सव सुरू होताच मंदिराच्या परिसरात जमा झालेल्या दोन महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. एकमेकांचे केस ओढून मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. यामध्ये इतर दोन ते तीन महिलांनीही मारहाणीत सहभाग घेतला तर एका तरुणाने दुसऱ्या एका तरुणालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही भाविकांनीच मध्यस्थी करून वाद सोडवला.
दरम्यान, मंदिर परिसरातील हाणामारीचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये हाणामारी होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात आता औंढा नागनाथ पोलिसांनी शुक्रवारी तातडीने संस्थान प्रशासनाशी संपर्क साधून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या फुटेजवरून त्या महिलांची व तरुणांची ओळख पटवून कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तर गर्दीमुळे धक्का लागणे व जागेच्या कारणावरून वाद झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सण आणि उत्सवाच्या काळात औंढा नागनाथ मंदिर परिसरात होत असलेली मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र या महिलांमध्ये हाणामारी होत असताना या परिसरात एकही पोलिस कर्मचारी दिसून आला नाही. अखेर भाविकांनीच हा वाद मिटवला. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच संरक्षण विषयक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.