Hingoli news: औंढा नागनाथ तालुक्यात बालकामगारांच्या संख्येत मोठी वाढ; प्रशासनाचे 'डोळेझाक' धोरण

Child labor in Aundha Nagnath|विभागीय कारवाई केवळ कागदावरच; व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
Child labor news
Child labor news
Published on
Updated on

औंढा नागनाथ: तालुक्यात सध्या बालकामगारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. हॉटेल, धाबे, आणि वीटभट्ट्यांपासून ते ऊसतोडणीपर्यंत अनेक धोकादायक कामांमध्ये अल्पवयीन मुले राबत असून, त्यांचे बालपण करपताना दिसत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिरड शहापूर येथे एका अल्पवयीन कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही, प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

विविध व्यवसायांत मुलांची मोठी पिळवणूक

तालुक्यातील हॉटेल, धाबे, किराणा दुकाने, छोटे-मोठे कटलरी व्यवसाय, लाईट-मंडप डेकोरेशन आणि चहाच्या टपऱ्यांवर बालकामगार मोठ्या प्रमाणावर काम करताना आढळत आहेत. याव्यतिरिक्त, कृषी क्षेत्रात ऊसतोडणीसाठी येणाऱ्या मजुरांमध्येही अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. मोढा परिसर आणि वीटभट्टी कारखान्यांमध्ये या मुलांकडून कष्टाची कामे करून घेतली जात आहेत.

महिला व बाल कल्याण विभागाचे दुर्लक्ष

बालकामगारांची शोधमोहीम राबवून त्यांच्या सुटकेची जबाबदारी महिला व बाल कल्याण अधिकारी कार्यालयाची आहे. मात्र, हा विभाग या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विभागाकडून केवळ कागदावर तपासणीचे अहवाल सादर केले जात असून, प्रत्यक्षात बालकांची जीवघेणी पिळवणूक सुरूच आहे. शिरड शहापूरमधील मृत्यूच्या घटनेने या प्रश्नाची भीषणता समोर आणली असली, तरी संबंधित यंत्रणा अद्याप 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत दिसत आहे.

कठोर कारवाईची मागणी

बालकामगार ठेवणे हा कायद्याने गुन्हा असतानाही, औंढा तालुक्यात हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. प्रशासनाने तातडीने विशेष पथके नेमून संपूर्ण तालुक्यात तपासणी मोहीम राबवावी आणि बालकामगार ठेवणाऱ्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news