

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ येथील बस स्थानकाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बेपत्ता झालेल्या एका महिलेचा मृतदेह सोमवारी दिनांक 12 रोजी दुपारच्या सुमारास आढळून आला. औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी मृतदेहाच्या बाजूला असलेल्या पिशवीत लग्नाची मूळ पत्रिका सापडल्यामुळे महिलेची ओळख पटली. स्वाती सतीश भगत वय 35 वर्ष राहणार पिंपळदरी असे महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
औढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे, उपनिरीक्षक शेख खुदुस, गजानन गिरी, वसीम पठाण, ज्ञानेश्वर गोरे ,ओंकारेश्वर रांजणीकर, रविकांत हरकाळ ,संदीप टाक, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेहाच्या परिसरात पाहणी केली असता सदर मृतदेह सात ते आठ दिवसापूर्वीचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
सापडलेल्यसा लग्नाच्या पत्रिकेवरून पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह पिंपळदरी येथील स्वाती भगत यांचा असल्याचे स्पष्ट झाले .दरम्यान मयत दहा दिवसापासून बेपत्ता होत्ती. बेपत्ता असल्याची नोंद ही औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक 3, मे रोजी दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. तपासणीनंतरच स्वाती यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. मयत स्वाती यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्धिनी सांगितले. औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत झाली नव्हती.