

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर वगरवाडी शिवारात ऐका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती औंढा पोलिसांना सायंकाळी सहा वाजता मिळाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी तातडीने औंढां पोलिसांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले. तेथे पाहणी केली असता मयत तरुणीच्या गळ्या भोवती रुमाल गुंडाळलेला आढळून आला आहे. तसेच गळ्यावर वण देखील दिसून आले. तसेच तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह बॅगमध्ये भरून या भागात आणून टाकला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर तरुणीचा मृत्यू कशामुळे व कधी झाला याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर सायंकाळी लगेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तर पोलिसांनी परिसरातील बेपत्ता तरुणीचा शोध सुरु केला असून त्यावरून या तरुणीचा ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक जी. एस.राहिरे व उपनिरीक्षक माधव जीवारे किशोर पोटे, जमादार संदीप टाक, मुजीब पठाण, इम्रान सिद्दिकी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.