

Crowd of devotees for darshan of Saint Namdev
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे रविवारी पहाटे पासूनच गर्दी केली होती. भाविकांनी नर्सीत हरिनामाचा गजर केला. त्यामुळे वातावरण धार्मिक बनले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास सव्वा लाख भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे रविवारी सकाळी सात वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, विश्वस्त मनोज आखरे, द्वारकादास सारडा, भिकूलाल बाहेती, राहूल नाईक, ब्रिजलाल तोष्णीवाल, उपसरपंच ज्ञानेश्वर किर्तनकार यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. सकाळी महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरम्यान, रविवारी पहाटे पासूनच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मिळेल त्या वाहनाने भाविक नर्सी येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले तर भाविकांच्या वाहतुकीची सोय व्हावी यासाठी हिंगोली आगाराने जादा बसेसची व्यवस्थाही केली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सव्वा लाख भाविकांनी दर्शन घेतले. या भाविकांसाठी गिलोरी येथील माणिकराव लोडे यांच्यावतीने ४० क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, हरिनामाचा गजर करीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यामुळे परिसरातील वातावरण धार्मिक बनले होते. ज्या भाविकांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते भाविक नर्सी नामदेव येथे दर्शनासाठी येऊन वारी पूर्ण करीत असतात.
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपाधीक्षक सुरेश दळवी यांनी नरसी येथे भेट देऊन पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.