

Bogus Voting Allegations in Hingoli Municipal Election CCTV: हिंगोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगोली नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक 17-अ मध्ये बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, हा प्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, मतदारांच्या ऐवजी उमेदवारांचे पोलिंग एजंटच मतदान करत असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
या प्रकरणी संबंधित वॉर्डातील उमेदवार सैय्यद जावेद यांनी थेट निवडणूक यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदान केंद्रातील कर्मचारी आणि उपविभागीय अधिकारी यांची संगनमताने ही प्रक्रिया पार पाडली. जावेद यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एकच व्यक्ती वेगवेगळ्या मतदारांच्या नावाने वारंवार मतदान करताना दिसत आहे. हा प्रकार एक-दोन वेळा नाही, तर दोन-तीन वेळा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे “मतदान केंद्रावर उपस्थित कर्मचारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली,” असा गंभीर आरोप जावेद यांनी केला आहे.
या घटनेमुळे आता इतर वॉर्डांतही अशीच बोगस प्रक्रिया राबवली गेली असावी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांमध्येही नाराजीचा सूर असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, सैय्यद जावेद यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र यांच्याकडे लेखी मागणी करत, वॉर्ड क्रमांक 17-अ मधील निवडणूक रद्द करून फेरमतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. लोकशाहीच्या विश्वासार्हतेसाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
आता या प्रकरणावर निवडणूक आयोग आणि प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार, दोषींवर कारवाई होते का, तसेच फेरमतदानाचा निर्णय घेतला जातो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.