

The results have changed the politics of Hingoli.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. स्थानिक निवडणुकांपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत संतोष बांगर यांनी अनेक वेळा आपली ताकद सिद्ध केली असून, या नगरपालिका निवडणुकांमधील निकालांनी त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल स्पष्टपणे दिसून आला आहे. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन नगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांत सत्तेची समीकरणे बदलली असून, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
विशेषतः शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने हिंगोली आणि कळमनुरी या दोन ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हिंगोली नगरपालिकेत भाजपकडून सत्ता हिसकावून घेत शिंदेसेनेने मोठा राजकीय संदेश दिला आहे तर वसमत येथे राष्ट्रवादीने बाजी मारत स्वतंत्र ताकद दाखवली आहे.
हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या पहिल्या फेरीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निता बांगर यांनी सुमारे १२०० मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजप समर्थकांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र दुसऱ्या फेरीपासून निवडणुकीचे चित्र बदलू लागले.
बांगर कुटुंबाचे वजन वाढले
विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही. या संपूर्ण विजयामागे आमदार संतोष बांगर यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. संघटनात्मक ताकद, प्रचारातील आक्रमकता आणि स्थानिक समीकरणांची अचूक मांडणी यामुळे शिवसेनेला हिंगोलीत यश मिळाले. रेखा बांगर या आमदार संतोष बांगर यांच्या वहिणी असून, त्यांच्या विजयामुळे बांगर कुटुंबाचे राजकीय वजन आणखी वाढले आहे.