

हिंगोली : येथे भाजपच्या वतीने शनिवारी आयोजित तिरंगा रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना भोवळ आली. हा प्रकार इतरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उचलून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना भोवळ आल्याचे सांगण्यात आले आहे.
हिंगोली येथे भाजपच्यावतीने शनिवारी सकाळी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता महात्मा गांधी चौकातून काढण्यात आलेल्या या रॅलीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तानाजी मुटकुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्वला तांभाळे, सुनीता मुळे, कृष्णा रुहाटीया, शाम खंडेलवाल, संजय ढोके यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखविलेले शौर्य देशासाठी अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर तिरंगा रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी शिडीवरून वर चढले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना भोवळ आल्याने ते खाली बसले. सदर प्रकार इतरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना काही जणांनी हातावर उचलून खाली आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना भोवळ आल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.