

औंढा नागनाथ ः तालुक्यातील पेरजाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारांतर्गत खिचडीसाठी तांदूळ कमी का दिला या कारणावरून मुख्याध्यापिकेस ढकलून देत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील पेरजाबाद येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा असून या ठिकाणी 47 विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनेमध्ये खिचडीचे वाटप केले जाते. खिचडीसाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या तुलनेत तांदूळ व इतर साहित्य खिचडी शिजविणाऱ्या महिलांना दिले जाते. दररोज वाटप होणाऱ्या तांदूळाचा हिशोब शाळा प्रशासनाला ठेवावा लागतो.
दरम्यान, सध्या औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील यात्रा असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली आहे. शाळेत 10 ते 12 विद्यार्थीच असल्यामुळे मु्ख्याध्यापिका मंजश्री चौधरी यांनी विद्यार्थी संख्येच्या तुलनेतच तांदूळ खिचडी शिजविण्यासाठी दिला होता. सदर प्रकार माहिती झाल्यानंतर गावातील गजानन जाधव व गोकर्णा जाधव शुक्रवारी शाळेत आले. यावेळी मुख्याध्यापिका चौधरी या वर्गावर शिकवत होत्या. मात्र त्यानंतरही गजानन व गोकर्णा यांनी खिचडी शिजविण्यासाठी तांदूळ कमी का दिला यावरून वाद घालण्यास सुरवात केली. विद्यार्थी कमी असून दररोज वाटप केलेल्या तांदूळाचा हिशेब ठेवावा लागतो असे चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान त्यांचे म्हणणे ऐकून न घेता दोघांनी त्यांना वर्गातच ढकलून देत त्यांना शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी मुख्याध्यापिका चौधरी यांनी औंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन व गोकर्णा यांच्या विरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत.