

केज ः भरधाव वेगातील एका कार दुचाकीला धडक देत नंतर दुकानात घुसल्याची घटना केज तालुक्यातील कानडीमाळी चौकात घडली. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असून या कारचा चालक मद्यधुंद असल्याचे नंतर समोर आले.
दि. 9 जानेवारी रोजी दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास केज येथील कानडी माळी चौकात मद्यधुंद अवस्थेतील कार चालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक तेलंगणा ) आणि त्याच्या शेजारी बसलेला धनराज बन्सी चाळक ( रा. लव्हूरी ता. केज) यांनी कानडी माळी चौकातील भगवान बाबा चबुतऱ्या जवळ कानडी माळीकडे वळत असताना एका मोटार सायकलला मागून धडक दिली.
त्या मोटार सायकलवर मागे बसलेली महिला आशाबाई धोंडीबा राऊत ( रा. समर्थनगर केज) या जखमी झाले. त्या नंतर तो भरधाव वेगात पळून जात असताना त्याने उजव्या बाजूला असलेल्या नेहा ब्युटी शॉपी आणि साई मंगल सेवा केंद्र या दुकानाला धडक दिली. या अपघातात दुकाना समोर उभी असलेली एक स्कुटी आणि मोटार सायकल यांचे नुकसान झाले. तर रस्त्याने सायकल वरून शाळेला जात असलेल्या विद्यार्थ्याच्या सायकलचे देखील नुकसान झाले आहे.
या अपघात मोटार सायकलवर मागे बसलेल्या आशाबाई धोंडीबा राऊत ( रा. समर्थनगर केज) आणि कारचालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक तेलंगणा ) आणि त्याच्या सोबत असलेला धनराज बन्सी चाळक ( रा. लव्हूरी ता. केज) हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, दत्तात्रय बिक्कड, राजू वाघमारे, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, त्रिंबक सोपने, संतोष गित्ते, गोरख फड, तांबारे यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली.
आधीच अरुंद त्यात दुकानासमोर साहित्य आणि वाहने
कानडी रस्त्यावर रस्ता अरुंद असल्यामुळे कायम वाहतूक कोंडी होत असते. त्यात दुचाकीस्वार वाहने रस्त्यावर उभी करतात आणि व्यावसायिक त्यांचे साहित्य दुकानाच्या बाहेर ठेवल्याने जास्तच अडचणी निर्माण होत आहेत.