

परभणी : शहर मनपाची निवडणूक काही ठराविक मुद्द्यांभोवतीच फिरत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी केंद्र शासनाच्या योजना आणण्यावर आपल्या प्रचारांमधून भर दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होताना दिसून येत नसल्याचे वास्तव आहे.
मनपा निवडणुकीत प्रामुख्याने भूमिगत गटार योजना, समांतर पाणीपुरवठा योजना, बायपास रोड याविषयी सर्वच राजकीय पक्ष घोषणा करताना दिसून येत असून अनेक ज्वलंत प्रश्नांना बगल देत निवडक मुद्याभोवतीच मनपा निवडणूक फिरताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार सभेत केंद्राच्या विविध योजना परभणी शहराच्या विकासासाठी आणण्याचे सांगितले. फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आपण मुख्यमंत्री असेपर्यंत बंद होऊ देणार नाही. लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबविण्याचे संकेत देत लाडक्या बहिणींना साद घातली.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक केंद्रातील योजना आणण्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिल्यानंतर परभणी शहराला दत्तक घेऊन बारामतीच्या धरतीवर परभणीचा विकास करू असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनावर निवडणुकीची वेळ मारून न्यायची अशीच भूमिका प्रमुख राजकीय पक्षांची दिसून येत आहे.
शहरवासीयांना आठ-आठ दिवस पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. परभणी शहर चारही बाजूंनी विस्तारत असताना मनपा प्रशासन नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी अपयशी ठरत असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यावर कुठलाही राजकीय पक्ष भाष्य करताना दिसून येत नसल्याचे वास्तव आहे. शहरात प्रमुख बाजारपेठेंमध्ये व प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढले असून यामुळे रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
परभणीच्या विकासाबाबत बोलत असताना शहरातील जुन्या 22 प्रसाधनगृहापैकी जवळपास आजघडीला पाच ते सहा प्रसाधनगृह सुरू असून उर्वरित सर्व अतिक्रमणांमुळे अथवा अन्य कारणांमुळे बंद पडले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत प्रसाधनगृह नसल्यामुळे विशेषतः महिला वर्गाची गैरसोय होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम नाही. परभणीत उद्योग आणण्याविषयी प्रमुख राजकीय पक्ष भाष्य करताना दिसून येत नाहीत.
आजतागायत मनपावर सत्ता गाजवणारे सत्ताधारी शहरवाशियाना दररोज पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. मूलभूत सुविधांचीच प्रचंड वाणवा असल्यानंतरही नागरिकही सत्ताधारी अथवा मनपा प्रशासनाला जाब विचारताना दिसून येत नाहीत. मनपा निवडणूक ठराविक मुद्यावरच फिरताना दिसून येत असून शहरातील बहुतांश भागांमध्ये लक्ष्मी अस्त्राचा वापर होणार असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये नागरिकही मिळेल ते पदरात पाडून घ्यायच्या मानसिकतेत असल्याचे दिसत आहे. यामुळे शहरवासीयांसाठी मूलभूत असलेले व नागरिकांसाठी ज्वलंत प्रश्न असलेले अनेक प्रश्न निवडणुकीच्या दरम्यान चर्चेलाच जात नसल्याचे वास्तव आहे.
शहरातील सुपर मार्केट, जुना मोंढा, क्रांती चौक येथील भाजी मंडई ओस पडल्या आहेत. भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या अशा वसमत रोडवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली असून यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मनपाची अतिक्रमण मोहीम कधीतरी सुरू होते आणि लहरीपणा आल्यागत लगेचच बंद पडते, ती बंद का पडते हे न उलगडणारे कोडे आहे.