

औंढा नागनाथ : महसूल कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणे ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. तालुका प्रमुखावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (दि. १८) काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
औंढा नागनाथ तालुका शिवसेनेच्या वतीने ठाकरे गटाच्या वतीने शासनाच्या विरोधात ११ जूनरोजी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर झटे यांनी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नावे घेऊन त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणामुळे महसूल कर्मचारी संघटनेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष इमरान पठाण, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, अनिता कोलगणे, वैजनाथ भालेराव, हेमा खाडे, अव्वल कारकून श्रीकृष्ण दराडे, संगीता बानम, बामन पल्ले यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान पठाण यांनी सांगितले.