

Aundha Nagnath Panchayat Samiti Fraud
औंढा नागनाथ : पंचायत समितीच्या कपातीच्या रकमेची चौकशी संपली असताना आता आणखी एक पीपीओ घोटाळा उघडकीस आला असून एका शिक्षकाच्या पत्नीस लाखो रुपयाची रक्कम देण्यात आली आहे, या प्रकरणाची आता लेखा विभागाने चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्या व्यक्तीचे कुटुंबनिवृत्ती वेतन स्थगित ठेवण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसात घोटाळ्याचे प्रकरणे मोठ्या प्रमाणावर चव्हाट्यावर येत आहेत.
सेनगाव पंचायत समितीने उन्हाळ्यात आलेला पाणी पुरवठा पोटी कंत्राटदाराला तब्बल 30 लाखाची ज्यादा रक्कम दिल्याचे स्पष्ट झाले. नंतर कंत्राटदाराकडून ही अतिरिक्त दिलेली रक्कम वसूल करण्यात आली. सेनगाव पंचायत समितीमध्ये कपातीचे रकमेबाबत तब्बल 43.77 लाखाचा घोटाळा झाल्याचे उघड झाले.
औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेचा 53 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांनी चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी करून 1.55 लाख रुपये उचलण्याचा प्रयत्न केला. या गैरव्यवहाराचे प्रकरण गाजत असतानाच आता औंढा नागनाथ पंचायत समिती मधील आणखी एक पीपीओ पेन्शन पेमेंट ऑर्डर मध्ये नवीन घोटाळा उघडकीस आला आहे.
यामध्ये पीपीओच्या छायाप्रतीवर मे 2024 ते 2025 या कालावधीमध्ये कुटुंब सेवा निवृत्ती वेतना अदा करण्यात आल्याचे उजेडात आले. विशेष म्हणजे कळमनुरी पंचायत समितीकडून मूळ प्रतिवर सेवानिवृत्ती वेतन अदा होत असताना औंढा पंचायत समितीने छायाप्रतिवर सेवानिवृत्ती वेतना अदा केले. दरम्यान संबंधित शिक्षकांच्या पत्नीच्या नावे दोन्ही पंचायत समितीकडून सेवानिवृत्ती वेतन जमा होत होते. सदर प्रकार जून महिन्यात शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
या प्रकरणात पंचायत समितीचा तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक लेखा कर्मचारी नितीन शर्मा याचाच हात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये पुढे येऊ लागले आहे. याप्रकरणी लेखा विभागाने चौकशी सुरू केली असून शिक्षकाची कुटुंब निवृत्ती वेतन तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे सुद्धा सांगितले आहे. अशा प्रकरणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कारभारावर शंका व्यक्त करण्यात येत असून दोषी कर्मचारी मात्र बिनभोभाट असले कारभार करीत आहेत.