

Aundha Nagnath Shakti Peeth Highway
औंढा : हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या 21 गावातील शेतकऱ्यांचे मनव ळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला असून त्यासाठी शेतकऱ्यांना महामार्गाचे फायदे पटवून दिले जाणार आहेत. याशिवाय तीन गावातून मोजणीचे कामही सुरू करण्यात आले आहे.
नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातुन जात आहे. या महामार्गामुळे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग जोडले जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गासाठी हिंगोली जिल्ह्यातील 24 गावातील 462 हेक्टर शेतकऱ्यांच्याजमिनी संपादित केल्या जाणार आहेत.
याशिवाय वन विभागाची दहा हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी कळमनुरी तालुक्यातील दाबडी, महालिंगी, झुनझुनू वाडी, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळी विर, डोंगरकडा, जवळा पांचाळ, वसफळ शिवारातील 756 शेतकऱ्यांच्या 156 हेक्टर जमीनी संपादित केली जाणार आहे.
वसमत तालुक्यातील गिरगाव, पळसगाव, गुंज ,रुजं, सावरगाव, आसेगाव, टाकळगाव, राजापूर, बाबुळगाव, पिंपळाचौरे, नरकापूर, लोणी बुद्रुक, हयात नगर, जवळा खुर्द, जवळा बुद्रुक, या शिवारातील 331 शेतकऱ्यांच्या 305 हेक्टर जमीन संपादित केल्या जाणार आहेत.
या मार्गासाठी जमीन संपादित केल्या जाणार असल्याने शेतकरी भूमीहीन होतील या भीतीने शेतक-यांनी जमीन संपादनाला विरोध सुरू केला आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको ,मोर्चा, उपोषणे देखील केले आहेत. मात्र आता या शेतकऱ्यांची मने वळविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी मंजुष मुथ्था, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रतीक्षाभूते, विकास माने, यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची तयारी चालविली आहे. याशिवाय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केले आहे.
कळमनुरी तालुक्यात विरोध नसलेल्या दाभडी, महालिंगी, झुंझुनू वाडी या तीन गावातून मात्र महामार्गाच्या मोजणीचे काम सुरू असून लवकरच पूर्ण करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे .